नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळावरून १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश आहे. संसदेतून निलंबन झाल्यानंतर त्यांनी संसद टीव्हीच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.
सांसद टीव्हीच्या मेरी कहानी कार्यक्रमाच्या अँकर पदावरून मी पायउतार होत आहे. संसदीय जबाबदाऱ्या पार पाडत असताना मनमानीपणे १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. मी खासदार म्हणून माझ्या कामाबद्दल कटिबद्ध आहे, तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दलदेखील कटिबद्ध आहे. त्यामुळे मी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे,’ असं चतुर्वेदींनी उपराष्ट्रपतींना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.