जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील पळासखेडा फाट्यावर लक्झरी बसने दोघा भावांना जबर धडक दिली. यात पाच वर्षीय आयान तडवी याचा जागीच मृत्यू झाला, तर रेहान नसीब तडवी हा अडीच वर्षाचा बालक गंभीर जखमी झाल्याचा प्रकार शनिवारी घडला. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी लक्झरी बस फत्तेपूर औट पोस्टला जमा केली.
सविस्तर असे की, आयान नसीब तडवी व त्याचा भाऊ रेहान नसीब तडवी हे दोघे देऊळगाव गुजरी येथील पळासखेडा काकर फाट्यावर खेळत होते. या वेळी बालाजी ट्रॅव्हल्सची (एमएच-२१, बीएच- ०६४७) लक्झरी बस धामणगाव येथून जामनेरकडे येत होती. या बसने दोघा भावांना जबर धडक दिली.
या अपघातात आयान तडवी याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ रेहान तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांसह अन्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी लक्झरी बसला पोलिस ठाण्यात जावू दिले.