नवी दिल्ली वृत्तसंस्था | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी जवाद वादळात रूपांतरित झाले. हे वादळ आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ रविवारी ओडिशात पुरीजवळील किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने शुक्रवारी आंध्र व ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला. दोन्ही राज्यांतील अनेक जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुढील ३ दिवस पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ताशी १०० ते ११० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नावाडी आणि मासेमारांनी समुद्रात न जाण्याची तसेच किनाऱ्यावरील कामे बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एनडीआरएफने परिस्थितीचा सामना करण्यासाठी ६४ तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. ४६ तुकड्या आधीच तैनात केल्या आहेत.