जामनेर : अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याने नैराश्यातून जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील शेतकऱ्याने आपल्याच शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास जीवन संपवलं. ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील (वय ४७) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
तोंडापूर येथील रहिवासी असलेले शेतकरी ज्ञानेश्वर पाटील सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे भारुडखेडा रस्त्यावरील स्वत:च्या शेतात गेले. त्यांनी सकाळी साडेआठ वाजता झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. शेताच्या शेजारीच असलेल्या संतोष गायके हे शेतात मजूर सोडण्यासाठी गेले असता त्यांना बाभळीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने ज्ञानेश्वर पाटील यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही बाब आबा पाटील यांना कळवली. आबा पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटलांच्या पुतण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर डिंगबर पाटील, नाना पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचं कर्ज आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांनी हे पाउल उचललं असावं, असा अंदाज कुटुंबियांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मृत ज्ञानेश्वर पाटील यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परिवार आहे.