जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा बँकेत सर्वात अगोदर अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली असून तीन वर्षांसाठी हे पद त्यांच्याकडे राहणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ तर कॉंग्रेसचे ३ असे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला गाफील ठेवत महाविकास आघाडीने पॅनल बनविण्याची घोषणा केली. तर भाजपने सत्ताधारी आघाडी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला. यामुळे भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ऐन वेळेस निवडणुकीतून माघार घेतली.
दरम्यान, काल खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी बैठक झाली. यात एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चीत करण्यात आल्याची माहिती दिली. तर शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांचे नाव निश्चीत करण्यात आले. आज दुपारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली तर देवकर आणि पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकार्यांनी स्वागत केले आहे.