जळगाव : जिल्हा बँकेत शुक्रवारी चेअरमनपदाची निवड होणार असल्याने महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक काल जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत चेअरमनपद आणि व्हाइस चेअरमनपदाबाबत फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
त्यानुसार बँकेचे अध्यक्षपद तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर दोन वर्षे शिवसेनेकडे राहील, असा निर्णय गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसला केवळ दोन वर्षे उपाध्यक्षपद देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. हा फार्म्युला निश्चित झाला असला तरी अद्यापही चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदाचे उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यातच आहे. कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते, हे आज शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे ११, शिवसेनेचे ६ तर कॉंग्रेसचे ३ असे उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तर कॉंग्रेसकडून आ. शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार उपस्थित होते. सुमारे दीड तास ही कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.