भडगाव । भडगावमध्ये च्युईंगम श्वासनलिकेत अडकल्यामुळे एका नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना काल गुरुवारी दुपारी घडली असून उमेश गणेश पाटील (१५, पांढरद ता. भडगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळकरी जीवनात अनेक मुलांना गोळ्या, बिस्किट, चॉकलेट खाण्यासह च्युईंगम खाण्याच्या सवयी असतात. मात्र ही सवय उमेशला चांगलीच महागात पडली. तो भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीत शिकत होता.
नववीत शिकणारा उमेश गणिताचा पेपर देऊन शाळा सुटल्यानंतर दुकानावरून च्युईंगम विकत घेतले आणि गावी जाण्यासाठी रिक्षात बसला. थोड्या वेळानंतर च्युईंगम खात असताना श्वसननलिकेत च्युईंगम अडकले. उमेश ला श्वसननलिकेत च्युईंगम अडकल्यानंतर अत्यंत अस्वस्थ वाटू लागले. ही बाब लक्षात येताच त्याला भडगाव येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र उमेशने पाचोरा येथे नेत असतानाच वाटेतच प्राण सोडले.
गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. सकाळी शाळेत आल्यानंतर उमेशने गणिताचा पेपर सोडवला व त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युईंगम चघळत असतानाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी सांगितले. श्वसननलिकेत च्युईंगम अडकल्याने त्याला अस्वस्थ वाटत होते. उमेश याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.