रावेर प्रतिनिधी | शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बालकावर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रावेर तालुक्यातील पाल भागात घडली. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला असून पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, असता त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
काय आहे घटना?
मांजल येथील गुराखी दिपला बारेला नेहमीप्रमाणे आज बुधवार सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीमध्ये गेला असतांना याठिकाणी दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व त्यानंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले.
याबाबत सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेलल्या घटनेबाबत सांगितले. गांवकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून हिंस्र प्राणी पसार झाला होता. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपला बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.
दिपल्या बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर हिंस्र प्राण्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कँन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली..