मुंबई : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या १२ तासांमध्ये राज्यभर चक्रीवादळाचा धोका वाढेल. पावसाची तीव्रता देखील वाढेल
याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंबंधी ट्विट देखील केलं आहे.
अधिक माहितीनुसार, चक्रीवादळामुळे राज्यात दमदार पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. हवामानाच्या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. अतिवृष्टीची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे. खासकरून रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.