चोपडा : तालुक्यातील सुटकार शेतशिवारात चढावावर ट्रॅक्टर ट्रॉलीसह कलंडले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्याने सुटकार येथील ३५ वर्षीय तरुण प्रभाकर ठाकरे याचा जागीच मृत्यू झाला. दि.२४ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सुटकार येथे ही घटना घडली.
सुटकार येथील रहिवासी प्रभाकर रामचंद्र ठाकरे हा युवक वडती (ता.चोपडा) येथून सुटकार येथील शेतात कांद्याचे रोप घेऊन ट्रॅक्टरने जात होता. कांद्याचे रोप असलेले ट्रॅक्टर सुटकार शिवारातील चढवावर चढत असतांना अचानक कलंडले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्याने प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृताच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.