बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रा-कोळी भागात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीने 20 सप्टेंबरला आत्महत्या केली. मात्र काल तिच्या आत्महत्येचं कारण उलगडलं. भगवद्गीतेमध्ये युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठित जे काही लिहिलं होतं ते वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला. यामध्ये तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक जण हा पीडितेचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, ही चिठ्ठी मिळताच तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेत सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
काय म्हटलं आहे सुसाईड नोटमध्ये?
तरुणीने चिठ्ठीत लिहिले की, “प्रिय पप्पा मला मरण्यासाठी भाग पाडणाऱ्या XXX व XXX ने माझा बलात्कार केला. माझी जिंदगी बरबाद केली. लहानपणापासून त्यांनी माझा बलात्कार केला. माझी तुम्हाला सांगायची एवढी हिंमत नव्हती. मला चारित्र्यावर कलंक लावून घ्यायचा नव्हता. मला माफ करा. माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. XXX व XXX भाऊ म्हणायच्या लायकीचे नाहीत. त्यांनी माझी जिंदगी खराब केली. माझ्या भावानेच माझा घात केला. सगळ्यात जास्त पाप XXX ने केलंय, त्याच्या बायकोचं ही पाप केलंय. हे तुम्हाला माहीत झालं असतं तर महाभारत घडलं असतं. हे सर्व लोकांना माहीत झालं असतं तर लोक तुम्हाले बोलले असते. मी जशी तडपून -तडपून मेले तसे तेही मरतील. माझ्या शांत स्वभावाने माझा घात झाला.”