मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून होते. अशात महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, राज्यातील शाळा अखेर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, कुठले वर्ग सुरू करण्यात येणार याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाहीये. यापूर्वी शाळा सुरू होण्याच्या संदर्भात विविध बातम्या समोर येत होत्या. पण आता अखेर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती देणार आहेत.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.