नवी दिल्ली । आज 18 दिवसांनी डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाईटनुसार, आज देशभरात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 20 ते 22 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.82 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.
पेट्रोल-डिझेल GST मध्ये समाविष्ट होणार नाही
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याच्या कयासांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही. ”
मोठ्या शहरातील दर?
>> दिल्ली पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.41 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.46 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये प्रति लीटर
दररोज 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.