मुंबई : महाराष्ट्रात वीजेचे संकट उभे राहिले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात लोडशेडिंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राकडे केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक असल्याने दिपनगरमधील तीन पैकी एक वीज निर्मिती संच बंद करण्यात आला आहे, अशी माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे
विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कॉल फील मध्ये पावसाचे पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटका महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे. पावसामुळे महानिर्मितीकडे कोळश्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीच्या सर्व केंद्रात भीषण कोळसा संकट गडद झाले आहे.
परिणामी सर्व वीज केंद्रांचे उत्पादन घटले असून परिणामी लोडशेडिंगचे संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असले तरी विदर्भातील बहुतांश भागात सध्या पाऊस सुरू असल्याने कोळसा टंचाईवर तूर्त दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यात एकूण सात सात केंद्रांवर वीज निर्मिती होते. यामध्ये चंद्रपूर, खापरखेडा, परळी, भुसावळ, नाशिक आणि पारस या सात केंद्रांचा समावेश आहे.पावसाळ्यामुळे कोळसा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यात वेकोलीकडून महानिर्मितीसाठी अपेक्षित साठ्याच्या ५० टक्केच कोळसा प्राप्त झाला. आता महानिर्मितीकडे केवळ एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे.
रोज येणाऱ्या कोळशावर सध्या वीज उत्पादन केले जात आहे. त्यामुळे महानिर्मितीला वीजनिर्मिती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वच केंद्रातील वीजनिर्मिती घटली आहे. महानिर्मितीला कोळसा येतो आहे पण ज्या प्रमाणात यायला हवा तसा येत नसल्याने हे संकट दिसत असल्याची माहिती महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 1लाख 12 हजार मेट्रिक टन असा 7 दिवसांचा कोळसा साठा अपेक्षित असताना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संचापैकी 210 मेगावॅटचा संच बंद करण्यात आला आहे.