वरणगाव प्रतिनिधी | पत्नी, मुले व आईला सुख देवू शकलो नाही. व्यसन जडले, त्यात काम नसल्याने आत्महत्या करत आहे’ अशी चिठ्ठी लिहून तळवेल येथे मामाच्या गावी आलेल्या ३० वर्षीय तरुणाने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जितेंद्र दत्तू देवरे असे मृताचे नाव आहे.
वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव (जि.औरंगाबाद) येथील जितेंद्र देवरे हा तरूण रोजगाराच्या शोधात मामाच्या गावी तळवेल (ता.भुसावळ) येथे कुटुंबासह आला होता. तो संजय नगरात रहिवासाला होता. मात्र, आधीच हलाखिची स्थिती, त्यात व्यसन जडल्याने कुटुंबात वाद होत असत.
यामुळेच रवींद्रची पत्नी पंधरा दिवसांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. तसेच त्याची आई गावी राहत होती. दरम्यान, घरात एकटाच असलेल्या रवींद्रने नैराश्यातून बुधवारी दुपारी ३ वाजेच्या पूर्वी स्लॅबच्या हुकला बारीक दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सकाळपासून जितेंद्रने घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारीच राहणाऱ्या मामांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
आत्महत्येपूर्वी जितेंद्रने तोडक्यामोडक्या शब्दात चिठ्ठी (सुसाइड नाेट) लिहिली. त्यात पत्नी, मुले व आईला सुख देवू शकलो नाही. व्यसन जडले व त्यात काम नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. यानंतर मृतदेह त्याच्या गावी सोयगावला नेण्यात आला.