चिनावल प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील चीनवल येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याने येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएमवर सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत तोबा गर्दी उसळली.
रात्री नऊ वाजेच्या सुमारास ईंडीकॅश कंपनीच्या लोडीग कर्मचाऱ्यांला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सावदा पोलीस स्टेशनला कळवून ए.टी.एम असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवले व एटीएम लॉक केले. तोपर्यंत बरीच रक्कम एटीएममधून काढली गेली होती.
दरम्यान, या प्रकाराची वाच्यता गावात होताच सर्वस्तरीय एटीएमधारकांनी या एटीएमवर गर्दी केली. एटीएममध्ये ५०० रुपये व त्याच्या पटीत रक्कम टाकल्यास चक्क पाच पट रक्कम निघत असल्याने अवघ्या अडीच तासात जवळजवळ सहा लाख रुपये येथून विड्राल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याबाबत अद्याप सावदा पोलीस स्टेशनला नोंद झाली नसली तरी एटीएम सुरक्षेसाठी हे. काँ. विनोद पाटील, रिजवान पिंजारी, ईशान तडवी, सुरेश अडाएगे, होमगार्ड प्रकाश भालेराव येथे तळ ठोकून आहेत.
सेटींगमध्ये चूक?
याबाबत एटीएमच्या लोडीग कर्मचाऱ्यांला विचारणा केली असता पैसे भरताना नोटांची ब्लॉक सेटींग चुकीची झाली असावी अथवा मशीन सेटींग बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या प्रकारामुळे मात्र चिनावलकरांना मात्र लॉटरी लागल्यागत अनुभव आला. चिनावल व पंचक्रोशीत या प्रकाराची जोरदार चर्चा होती. अद्यापपावेतो ईडीकॅश कंपनीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.