यावल प्रतिनिधी : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना यावल- चोपडा मार्गावरील भारत तोलकाटयाच्या जवळ घडली. रोहीत अरूण कोळी (वय २६, रा.साकळी, ता.यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
साकळी येथील रोहित कोळी हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १४ जेएन २६८५ वाहनाने रात्री ९ वाजेच्या सुमारास साकळीकडुन किनगावकडे जात असतांना यावल- चोपडा मार्गावरील साकळी गावापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या भारत तोलकाटयाच्या जवळ अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकला धडक दिली. त्यात रोहित याचा जागेवरच मृत्यू झाला. अज्ञात वाहनधारक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
दरम्यान मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन, याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली. अपघाताची माहीती कळताच पंचायत समितीचे सदस्य दिपक अण्णा पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह साकळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुदैवी घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.