चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीतसिंग चन्नी अखेर शपथ घेतली आहे. त्यामुळे ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासोबत दोन मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
चरणजीतसिंग चन्नी यांनी आज सकाळी राजभवन येथे जाऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थित मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चन्नी यांच्याशिवाय सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदी नेते उपस्थित होते.
कोण आहेत चन्नी?
चरणजीतसिंग चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री होते. त्यापूर्वी ते 2015 ते 2016पर्यंत पंजाबमध्ये विरोधी पक्षनेते होते. चरणजीतसिंग चेन्नी हे रामदासिया शीख समुदायातील आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारमध्ये ते 16 मार्च 2017मध्ये वयाच्या 47व्या वर्षी कॅबिनेट मंत्री झाले होते. चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा आमदार झाले होते. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.