मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघडकीस आणला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत.
माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.