नंदुरबार,(प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे ‘मॉक ड्रिल’ च्या कामात गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती नुसार प्रथम दर्शनी उघड झाले असून यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी संगनमताने हा गैरव्यावहार केला असल्याचा संशय असून त्यांच्या माहिती शिवाय हा गैरव्यावहार होऊच शकत नाही अशी तक्रार पत्रकार प्रविण सपकाळे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त श्री.रामास्वामी यांच्याकडे दि. 15 सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे मॉक ड्रिल ‘ चे काम करून घेण्यासाठी काम करणाऱ्या तीन संस्थाकडून दर मागविण्यात आले होते. तीन संस्थानी काम करण्याची तयारी दर्शवून दर दिले होते व ज्या संस्थेने सर्वात कमी दर दिले त्या संस्थेस काम दिले असे दाखविण्यात आले आहे. मात्र हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे मला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहिती वरून दिसून येत आहे.
‘मॉक ड्रिल’ चे काम ज्या संस्थेला देण्यात आले त्या संस्थेच्या दर पत्र असलेल्या लेटर हेड वर असलेला मोबाईल नंबर व इमेल आणि जळगाव येथील एका संस्थेच्या दरपत्रक असलेल्या लेटरहेड वर असलेला मोबाईल नंबर व इमेल हा एकच आहे. त्याच बरोबर तीनही संस्थांनाच्या लेटरहेड वरील मजकूर सारखा, तंतोतंत आहे. यावरून स्पष्ट होतं की सदर दर पत्रक हे काम घेणाऱ्या संस्था व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संगनमताने तयार करून घेतले आहे.
‘मॉक ड्रिल’ चे काम आपल्या मर्जीतल्या संस्थेला मिळवून देण्यासाठी हा सर्व कागदोपत्री बनाव केला आहे. मर्जितल्या संस्थेला काम देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या कामी रबविण्यात आलेली प्रक्रिया पारदर्शक राबवलेली नाही. यातून जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील नक्कीच आर्थिक लाभ झाला असेल त्याशिवाय ते एखाद्या संस्थेप्रति झुकतेमाप देणार नाही.तरी या प्रकरणी चौकशी करून ‘मॉक ड्रिल’ गैरव्यवहार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर तात्काळ कारवाई करावी ही विनंती.
दरम्यान यापूर्वी देखील मी आपल्या कार्यालयाकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी स्वच्छता सेवा ई – निविदा राबवितांना केल्या बेजबादार पणा व मर्जितल्या संस्थेला काम मिळवून देण्यासाठी केलेल्या कृती बाबत तक्रार केली आहे. आपल्या कार्यालयाने डॉ. भोये यांच्याकडे याबाबत खुलासा देखील मागितला आहे मात्र अद्याप या प्रकरणी काय कार्यवाही झाली याबाबत मला अद्याप कळविण्यात आलेले नाही.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी नंदुरबार येथे सेवा बजावत असतांना त्यांच्या संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची उच्च स्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे.तरी आपणास विनंती की माझ्या तक्रारीची गंभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी सोबत मला माहिती अधिकारात प्राप्त माहितीचे दस्ताएवज जोडले असल्याचं म्हटलं आहे.