जळगाव प्रतिनिधी | नातेवाईक असलेल्या एका तरुणाने १४ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केले. त्यात ही मुलगी गर्भवती झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी संशयित तरुणाला अटक केली आहे.
दीपक सुभाष पवार (वय २८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मे-जून २०२१ दरम्यान जळगाव तालुक्यात घडली आहे. दीपक याच्या नात्यात असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने घरात प्रवेश केला. यानंतर मुलीच्या तोंडाला रुमाल लावून तिचे हातपाय साडीने बांधले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केले.
ही बाब कोणास सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कोणाला काहीच सांगितले नाही. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी प्रकृती खराब झाल्याने या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या वेळी मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीने आईस दिलेल्या माहितीनंतर दीपकविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.