मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरु असलेल्या घसरणीची मालिका शुक्रवारीही कायम राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात 0.03 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा 46,060 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. हा गेल्या पाच महिन्यांतील सर्वात निचांकी स्तर आहे.
गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 10140 रुपयांनी स्वस्त आहे.
तर दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी वाढून 61.231 रुपये प्रतिकिलो या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या सत्रात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यावेळी चांदीचा भाव जवळपास 2150 रुपयांनी घसरला होता.
22 कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 46,150 रुपये आणि 45,780 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचे दर 44,300 रुपये प्रति तोळा आहेत.
24 कॅरेट सोन्याचा दर
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,350 रुपये प्रति तोळा, मुंबईत 46,780 रुपये प्रति तोळा, चेन्नईत 48,330 रुपये प्रति तोळा तर कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,000 रुपये प्रति तोळा आहे.
‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.