नवी दिल्लीः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारने राज्यांना इशारा दिला आहे. सणासुदीत होणारी गर्दी नियंत्रणात आणवी. तसंच सण अतिशय साधेपणाने साजरे केल्यास कोरोनाविरोधी लढाईत वरचढ ठरू शकू, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. राज्यांनी यासाठी पूर्णपणे तयार राहावं, असं पॉल म्हणाले. तसंच आगामी दोन महिन्यांत सणासुदीच्या काळात करोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं आहे.
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान येऊ शकते, असं सर्व अंदाजांमध्ये वर्तवण्यात आलं आहे. देशात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे आणि केरळमधील स्थितीही सुधारत आहे. पण तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आपल्या तयारीत कुठलीही कमतरता ठेवू नये, असं पॉल म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्य सरकारांपासून ते नगरपालिकांनी रुग्णालयांमध्ये पुरेशा बेडची व्यवस्था आणि इतर तयारी पूर्ण करावी, असं पॉल यांनी म्हटलं आहे. तयारीत उणीवा राहिल्यास करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली होती. अशा स्थितीपासून वाचण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्या करता केंद्राने २३ हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी काही दिवासांपूर्वी या पॅकेजच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
‘सणासुदीत गर्दीपासून दूर राहा’
तिसरी लाट रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा आणि करोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं आणि लस घ्यावी, असं डॉक्टर व्ही. के. पॉल म्हणाले. लसीमुळे करोनापासून सुरक्षा मिळते. तसंच तिसऱ्या लाटेची गंभीरता कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं. करोनावरील लसीच्या एका डोसमुळेह जवळपास ९७ टक्के मृत्यूंचा धोका कमी होत आहे, असं गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव म्हणाले होते.