जिल्हा सहकारी दूध संघाने पुन्हा एकदा नव्याने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्याच महिन्यात जमा करण्यात आलेले सर्व अर्ज बाद ठरवण्यात आले असून नव्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
ही भरती 132 जागांसाठी आहे. संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत संपल्याने कर्मचारी भरतीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचा आक्षेप घेतल्याने ही भरती वादग्रस्त ठरली होती. दरम्यान, परीक्षा घेऊन भरती करण्याचा निर्णय दुधसंघाने घेतला आहे. येत्या 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाने 86 सहाय्यक आणि 46 टेक्नीशियन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या महिन्यात ज्या उमेदवारांनी संघात अर्ज केले होते. ते सर्व अर्ज बाद ठरवून भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. संचालक मंडळाने नव्याने भरतीचा निर्णय घेतला असून उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवले आहेत. परीक्षा घेवून ही भरती प्रक्रिया करण्यात येईल.
परंतु, कोणत्या एजन्सीमार्फत परीक्षा घेण्यात येईल, परीक्षेचे स्वरूप काय असेल? किती गुणांची परीक्षा असेल? याबाबत मात्र संघाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत उल्लेख केलेला नाही. येत्या 7 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या प्रक्रियेत केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच चलन भरावे लागणार आहे.
ऑनलाइन चलन भरण्याचा पर्याय दिलेला नसल्याने इच्छुक उमेदवारांची अडचण होत आहे. जिल्हाबाहेरील इच्छुकांना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अटीमुळे चलन भरताना कसरत करावी लागत आहे. संघाने परीक्षेसाठी 1 हजार रूपये परीक्षा शुल्क ठेवले आहे.