मुंबई : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकीकडे फडणवीसांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ एकनाथ खडसेही शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, यावेळी खडसे यांनी पवार यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली. ते रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर काल पहिल्यांदाच पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी जाऊन आले आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण सदिच्छा भेट घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. तसेच मंगळवारी ते भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी मुक्ताईनगरच्या त्यांच्या घरी गेले होते.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होत असून जळगाव राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडींची या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.