नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. अशातच देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. परंतु, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE) घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. तसेच ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 8 ते 26 ऑगस्ट असा असणार आहे.
सीबीएसईने परीक्षा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये निकाल जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सीबीएसई बोर्डाने दोन पर्याय सुचवले. यापैकी एक म्हणजे फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे किंवा सर्व विषयांची परीक्षा तीन तासांऐवजी दीड तासांची घेण्याचे सुचवले होते.
मात्र, काही मंत्र्यांनी या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणाची मागणी केली होती. यातील दुसरा प्रकार स्वीकारल्यास परीक्षेची पद्धत बदलली जाईल. 1.5 तासांच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण करता यावी यासाठी केवळ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू-MCQ) आणि अगदी लहान उत्तरे लिहिण्याचे प्रश्न असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या दोन्ही पर्यायांबाबत राज्यांची मते २५ मे पर्यंत विस्तृतपणे मागवली आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.