जळगाव दिनांक १० ( प्रतिनिधी ) : रस्ते व पूल हे दळणवळणासाठी उपयुक्त असून यांच्या मदतीने परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना लाभ होत असून त्यांचा प्रवास सुकर होत असतो. यामुळे मतदारसंघातील जास्तीत जास्त रस्ते दर्जोन्नत करून डांबरीकरणासह पूर्ण करणार असल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते तालुक्यातील पुल व रस्ते कामांच्या भूमिपुजनाप्रसंगी बोलत होते. तर भोकर पुल या अतिशय महत्वाकांक्षी अशा तब्बल १५२ कोटी रूपये मूल्य असणार्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून याचे काम ३ महिन्यात प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.
या कामांना झाली सुरुवात
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज जळगाव तालुक्यातील रस्ते आणि पुलाच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यात किनोद ते फुफनी या रस्त्याच्या कामाचे नूतनीकरण (मुल्य १ कोटी २० लक्ष रूपये); घार्डी ते नांद्रा दरम्यान पुलाचे काम ( मुल्य १ कोटी ५० लक्ष रूपये) आणि जामोद ते भोकरच्या दरम्यान लहान पुलाचे काम (मुल्य ४० लक्ष रूपये) या कामांचा समावेश आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ४२ कोटी रूपयांच्या रस्ते व पुलाच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यात जळगाव तालुक्यासाठी २५ कोटी तर धरणगावसाठी १७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच आज ३ कोटी १० लक्ष रूपयांच्या कामांना प्रारंभ करण्यात आलेला आहे. कोविडच्या आपत्तीमुळे विकासकामांना निधी मिळण्यात अडचणी येत असतांनाही ही कामे सुरू करण्यात आल्याची बाब लक्षणीय आहे.
दरम्यान, भूमिपुजन झाल्यानंतर आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, रस्ते आणि पुल हे दळणवळणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. याचा परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना लाभ होणार आहे. सध्या कोविडची आपत्ती असल्याने निधीची कमतरता असली तरी अचूक नियोजन करून मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आपण कटीबध्द आहोत. मतदारसंघातील शेत रस्ते आणि शिवरस्त्यांना दर्जोन्नत करून त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासह त्यांचे डांबरीकरण करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.
तसेच जळगाव, चोपडा आणि धरणगाव या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणार्या भोकर ते खेडी भोकरी दरम्यानच्या तापी नदीवरील अतिशय महत्वाकांक्षी अशा तब्बल १५२ कोटी रूपयांच्या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिणामी ३ महिन्यात या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. या पुलामुळे या मार्गावरून ये-जा करणार्या लाखो वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांचा फेरा वाचणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
पालकमंत्र्यांचे आवाहन…
दरम्यान, सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. ते म्हणाले की, कोविडच्या प्रतिकारासाठी प्रशासनाने सर्वातोपरी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सर्वांनी कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे. आणि महत्वाचे म्हणजे कोणतीही लक्षणे आढळून आल्यानंतर जरादेखील अंगावर न काढता चाचणी करून घ्यावी. वेळीच उपचार झाल्याचे कोरोना बरा होतो. यामुळे कुणीही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी-१ ) सुभाष राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्ननातून जळगांव ग्रामीण भागात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाले असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त रस्ते मार्गी लागले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जनाअप्पा पाटील- कोळी, रामचंद्रबापू पाटील , बालाशेठ लाठी, प्रमोद सोनवणे, समाधान पाटील, पंकज पाटील, मुरलीधर पाटील , सरपंच हरीश पवार, अनिल भोळे, शिवाजी सोनवणे, बाळू अहिरे, सा.बा.चे सहाय्यक अभियंता सुभाष राऊत, शाखा अभियंता श्री महाजन व बेडिस्कर , मच्छीन्द्र पाटील, ठेकेदार सुधाकर कोळी, शेखर तायडे, मनोहर पाटील दिलीप जगताप, यांच्यासह सरपंच ग्रा.पं. सदस्य , प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.