जळगाव – जिल्ह्यात आतापर्यंत ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव, धुळे, औरंगाबाद या आजूबाजूच्या जिल्ह्यांपेक्षा मृत्यू दर आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे,
जिल्ह्यातील बरेच रुग्ण हे शेवटच्या स्टेजला आल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले, तर काही रुग्णांचा रिपोर्ट हा मृत्यू नंतर पॉझिटिव्ह आला आहे
याचा अर्थ एकच आहे की जिल्ह्यात खूप दिवस आधीच कोरोना ने शिरकाव केला आहे फक्त रुग्ण आता मिळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून यामुळे त्या रुग्णांचा नकळतपणे संपर्क हा खूप जणांना झाला असल्याची शक्यता आहे.
अजून खूप रुग्ण पुढील काळात निघण्याची शक्यता आहे. सुदैवाने आपल्या तालुक्यात आजतागायत एकही रुग्ण आढळला नसला तरी भविष्यात रुग्णसंख्या शून्यच ठेवण्यासाठी आपण सर्वांनी जनता कर्फ्यु गट – तट – पक्ष भेद बाजूला ठेवत मी चाळीसगावकर या भावनेने यशस्वी करून दाखवा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
आपण चोहोबाजूंनी कोरोनाच्या विळख्यात आहोत.
या संकटकाळात अनेक सामाजिक संघटना, सामाजिक – राजकीय कार्यकर्ते हे गरजूंच्या मदतीसाठी मागील 35 दिवसांपासून काम करत आहेत त्यांचे देखील आभार मानणे आपले कर्तव्य असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
या बैठकीत भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे यांनी प्रास्ताविक करत आपली भूमिका मांडली तर खासदार उन्मेश पाटील, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, समता सैनिक दलाचे संस्थापक नानासाहेब बागुल, मेडिकल असोसिएशनचे योगेश भोकरे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आर डी चौधरी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांनी मनोगतात जनता कर्फ्यु संदर्भात आपले विचार व्यक्त केले.
चाळीसगाव तालुका हा चारही बाजूने कोरोना हॉटस्पॉट ने वेढला गेला आहे, आजूबाजूच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील कोरोना बाधित संपर्कात येण्याची शक्यता लक्षात घेता शुक्रवार दि.१ मे ते रविवार दि.३ मे या कालावधीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय चाळीसगाव तालुक्यातील सर्व राजकिय पक्ष – सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी, मेडिकल, भाजीपाला, किराणा व भुसार असोसिएशन आदी व्यापारी संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहमतीने व उपस्थितीत हा घेण्यात आला.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने अंत्योदय जनसेवा कार्यालयात झालेल्या या बैठकीला खासदार उन्मेश पाटील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना प्रमुख , स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन , फर्टीलायझर असोसिएशन, किराणा व भुसार व्यापारी, भाजीपाला, दूध विक्रेते असे 50 ते 70 प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत कोरोणाच्या वाढत्या प्रसारा बाबत सर्वांनी चिंता व्यक्त करून चाळीसगाव तालुका व शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी तीन दिवस कडक कर्फ्यु पाळण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की ,1 मे ते 3 मे या दिवसांसाठी शहरात शंभर टक्के कर्फ्यु पाळण्यात यावा .
या काळात किराणा, भाजीपाला, फर्टीलायझर ,मटण ,चिकन ची दुकाने देखील सदर तीन दिवस बंद ठेवण्यात येतील .
तरी सर्व चाळीसगाव च्या हितासाठी … 1 मे ते 3 मे हे तीन दिवस आपण सर्वांनी घरातच राहावे . कोणीही, कोणत्याही कारणास्तव बाहेर फिरू नये .
या तीन दिवसात दवाखाने व मेडिकल हे मर्यादित वेळे साठी चालू राहतील .
हा जनतेचा कर्फ्यु आहे .
जनतेनेच यशस्वी करायचा आहे .
त्यातच चाळीसगावकरांचे हित आहे .
तरी हा कर्फ्यु 100 टक्के यशस्वी करावा असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतात केले .
१) दि.30 एप्रिल रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने 8 ते 1 या वेळेत उघडी असतील याची नोंद घ्यावी.
२) दिनांक १/०५/२० ते ३/०५/२० पर्यंत शहरा मध्ये हॉस्पिटल ला असलेलेच मेडिकल सुरू राहतील व उर्वरित सर्व मेडिकल हे 100% बंद असणार आहे
तसेच ग्रामीण मेडिकल पण बंद राहतील पण डॉक्टर यांनी सांगितल्यावर औषधी उपलब्ध करून देतील.
३) फक्त दुध विक्री केंद्रे सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहतील.