नवी दिल्ली – नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी वामपंथी आणि मुस्लिम संघटनांनी कर्नाटक बिहारसह देशातील इतर राज्यात बंद पुकारला आहे. यादरम्यान बिहारच्या पाटणा, दरभंगासह अनेक शहरांत माकपा कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको केला आहे. तर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू असताना आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेता संदीप दीक्षित यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. डीएमआरसीने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील 7 मेट्रो स्टेशन बंद केले आहे. कर्नाटकमध्ये पुढील तीन दिवस कलम 144 लागू राहणार आहे. बंगळुरु येथे झालेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी इतिहासकार रामचंद्र गुहाला ताब्यात घेतले. तर उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये आंदोलनकर्त्यांनी एक बस पेटवली.
दिल्ली – लाल किल्ला परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यानंतरही निदर्शनकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. निदर्शनादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून डीएमआरसीने पटेल चौक, लोक कल्याण मार्ग, उद्योग भवन, आयटीओ, प्रगती मैदान, खान मार्केट आणि केंद्रीय सचिवालय इत्यादी मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. माकपाच्या निदर्शकांना मंडी हाऊसपासून जंतर मंतरकडे नेण्यात आले. पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे जाम झाले. जामिया आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी संवेदनशील भागात फ्लॅग मार्च केला. अनेक एअरलाईन्सचे क्रू मेंबर्स ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यामुळे 16 उड्डाणे लांबणीवर पडली. इंडिगोला 19 उड्डाणे रद्द करावी लागली.
बिहार : नागरिकत्व विधेयकाविरोधात पुकारलेल्या बंदमध्ये राज्यातील अनेक शहरांत निदर्शने झाली. माकपा कार्यकर्त्यांनी पाटणा, दरभंगा आणि खगडिया येथे रेल्वे थांबवल्या आणि महामार्ग जाम केले. बंदच्या पार्श्वभूमीवर पटना जंक्शन, राजेंद्र नगर टर्मिनलसह बिहारमधील सर्व स्थानकांवर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाटणातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस, रालोसपा आणि इतर पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
कर्नाटक : कलबुर्गीमध्ये डाव्या आणि मुस्लिम संघटनांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. बंगळुरुत निदर्शनादरम्यान पोलिसांनी इतिहासकार रामचंद्र गुहा यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात बंदमुळे पोलिस सज्ज झाले आहेत. बंगळुरु, कलबुर्गी, दक्षिण कन्नड आणि आसपासच्या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांपर्यंत (21 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत) कलम 144 लागू राहणार आहे. मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा म्हणाले की, या निषेध आणि बंदच्या मागे काँग्रेसचा हाथ आहे. त्यांचे नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मुस्लिमांचीही जबाबदारी माझ्यावर आहे. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.














