नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. डाव्या पक्षांनी भारत बंदची हाक दिली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने २००३ ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समोर आणला आहे. बांगलादेशमध्ये धार्मिक अत्याचाराचे बळी ठरलेल्या निर्वासितांबाबत सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा सल्ला मनमोहन सिंह यांनी दिला होता.
केंद्रात २००३ ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार होतं. त्यावेळी राज्यसभेत मनमोहन सिंह विरोधी पक्षनेते होते. सभागृहात उपस्थित असलेले तत्कालीन उप-पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना संबोधित करत मनमोहन सिंह यांनी भाषण केलं होतं.
या भाषणात ते म्हणाले, ‘मला निर्वासितांसमोर असलेलं संकट आपल्यासमोर मांडायचं आहे. फाळणीनंतर आपला शेजारी देश बांगलादेशमध्ये धार्मिक आधारावर नागरिकांचा छळ करण्यात आला. जर हे पीडित लोक आपल्या देशात निर्वासित म्हणून आले, तर त्यांना शरण देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या लोकांबाबत आपलं धोरण उदार असायला हवं. मी अत्यंत गांभीर्याने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाकडे उप-पंतप्रधानांचं लक्ष वेधू इच्छितो.’
















