जळगाव,(प्रतिनिधी)- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदे पंडित उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारी जाहीर केली असून उज्वल निकम हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत. (Loksabha Election) गेल्या लोकसभा निवडणूकीत सुद्धा त्यांचं नावं चर्चेत आलं होतं यावेळेसही त्यांचं नावं आघाडीवर होतं अखेर त्यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे.


उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदे पंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केल्याने गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पाहता निकम यांना उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. त्यानुसार उमेदवारी जाहिर करून भाजपने सगळ्यांना आश्चर्याचा जोरधार धक्का दिला आहे.










