जळगाव : मुस्लिम मतपेटीवर डोळा ठेवून काँग्रेस मतांचे राजकारण करत असल्याचे मत भाजपाचे राज्यसभेतील माजी खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवतीर्थ मैदाना समोरील जी.एम. फाउंडेशन येथे भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, कपोलकल्पित माहिती पसरवून दहशतवादी कसाब बाबत काँग्रेस सहानुभूती दाखवत आहेत. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी जाहीरपणे मुस्लिम धार्जिणी भूमिका मांडली आहे. यावरून काँग्रेसला मुस्लिम मतांचा मोह असल्याने स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी उत्तरे दिली.
राममंदिर निर्माण बाबत भाजपा कोणतेही राजकारण करत नसून मतदारांना दिलेल्या राम मंदिर निर्माण करण्याच्या आश्वासनांची पूर्तता केली एवढेच मतदारांना सांगितले जात आहे.
भाजपा हा केलेल्या कामगिरीवर मते मागत आहे तर विरोधी पक्षाकडे मुद्देच नसल्याने भ्रम निर्माण करणारे वक्तव्ये करून मते मागत असल्याचेही डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नांवर माहिती देताना डॉ.विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय न्याय देणारा आहे.म्हणून मराठा समाज कोणाच्याही चिथावणीला बळी पडणार नाही. यावेळी शेतकऱ्याच्या शेतमालाला उचित भाव मिळाला पाहिजे अशी भाजपची भूमिका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला भाजपच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, डॉ.राधाकृष्ण चौधरी, राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते.










