जळगाव : ज्यांना स्वकर्तुत्वाने निवडून येता येत नाही, ते जातीचा आधार घेतात. समाजवाद,धर्मनिरपेक्षता,मूलभूत अधिकार हे संविधानातून कोणालाही काढता येणार नाही.उलट काँग्रेसने ८० वेळा संविधान दुरुस्ती करून बदलण्याचे पाप केले आहे. असे रोखठोक मत भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउंड) येथे
जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित महासभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी सांगितले की,सबका साथ सबका विकास सबका प्रयास हे मोदी सरकारचे धोरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध जनहिताच्या योजना सुरू केल्या,या योजनांचा लाभ जसे हिंदू घेताहेत तसेच मुस्लिम समाज देखील घेतोय. या मातृभूमी साठी काम करायचे आहे.यासाठी छञपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे.आम्हाला रामराज्य व शिवशाही निर्माण करायची आहे. असे विचार व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले की, शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न आहेत.आज शेतकरी बायो इंधन तयार करू लागला आहे.शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इंधनांवर विमान चालवले जात आहे.भारत एनर्जी आयात करणारा नको तर एनर्जी निर्यात करणारा देश बनविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभा निडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
नितीन गडकरी सभेत येण्यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी शहर विकासाचे व्हिजन मांडले.यावेळी मतदारांनी उस्फुर्त दाद देवून स्मिता वाघ आगे बढो अशा जोरदार घोषण दिल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ. राजुमामा भोळे, मनसे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अभिजित पानसे, पीपल्स रिपाइंचे राजू मोरे, शिवसेनेच्या सरिता कोल्हे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज आदींची भाषणे झाली.
मंचावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील,माजी खासदार ए,टी.नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ.चिमणरावआबा पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, भाजपाचे लोकसभा निरीक्षक रणजीत सावरकर, विधानसभा निरीक्षक प्रशांत परिचारक, माजी आमदार चंदू पटेल, भाजपाचे जळगाव महानगर अध्यक्ष उज्वला भेंडाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, म्हशीचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेला जळगावकरांची अलोट गर्दी उसळली होती.










